नालासोपारा – बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराची भयंकर घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस येऊन त्याचे पडसाद उमटत असतानाच नालासोपारा येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असली तरी या शिक्षकाला गेली अनेक वर्षे पाठीशी घालणार्या शाळा प्रशासनाला मात्र पोलिसांनी हात लावलेला नाही. शाळा प्रशासन आणि आरोपी शिक्षकाच्या विरोधात पीडितेचा भाऊ सातत्याने तक्रार करीत असूनही त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भागातील अनेकांनी शाळा आणि शिक्षकाच्या विरोधात कॅमेर्यासमोर येऊन तक्रार केली आहे. मात्र पोलीस कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत.
रविवारी 11 ऑगस्ट रोजी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली. यात तिने शाळेतील शिक्षक अमित दुबे हा मार्च 2024 ते जुलै 2024 या संपूर्ण काळात तिच्यावर वलई पाडा येथील अनेक ठिकाणी सातत्याने अत्याचार करीत असल्याचे म्हटले आहे. शाळेत आणि क्लासमध्ये त्याने अत्याचार केल्याची तक्रार मुलीने केली. त्यानंतर पोलिसांनी अमित दुबे याला अटक केली. मात्र ज्या शाळेत हा शिक्षक शिकवत होता त्या शाळेच्या प्रशासनावर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
नालासोपारा पूर्व येथे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत आरोपी दुबे हा शिक्षक होता. वलई पाडा येथे तो खासगी शिकवणीही घ्यायचा. या शाळेत असलेल्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर गेली 5 महिने तो लैंगिक अत्याचार करीत होता. एक दिवस ही पीडिता शाळेतून घरी आली नाही. त्यामुळे तिचा भाऊ अस्वस्थ झाला. यावेळी ती शाळेत बेशुद्ध पडली असून, तिला घरी घेऊन जा, असा निरोप शाळेतून आला. भाऊ शाळेत गेल्यावर बहिणीची स्थिती पाहून त्याने बहिणीला रुग्णालयात दाखल करण्याचे ठरविले. मात्र भावाचा आरोप आहे की, शाळेच्या विश्वस्तांपैकी एकाने घरी येऊन त्याला रुग्णालयात न जाण्याचा सल्ला दिला आणि बहिणीवर घरीच उपचार करू, असा दबाव आणला. बहिणीवर अत्याचार झाल्याचे कळल्यानंतर मात्र भावाने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि बहिणीने 11 ऑगस्टला शिक्षक दुबे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दुबेला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मात्र भावाचे म्हणणे आहे की, तो या शाळेत शिकत होता. गेल्या वर्षीच 10 वी उत्तीर्ण झाल्याने त्याची शाळा सुटली. मात्र शाळेत असताना गेली जवळ जवळ दोन वर्षे तो सातत्याने या शिक्षकाच्या विरोधात तक्रार करीत होता. हा शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करायचा. इतकेच नव्हे तर त्याने शाळेतील एका शिक्षिकेलाही खूप त्रास दिला. या शिक्षकाला शाळेतून काढा, अशी मागणी शाळेतीलच अनेक विद्यार्थी सातत्याने करत होते. मात्र प्रशासनाने त्यांचे ऐकले नाही आणि अखेर या भावाच्या बहिणीचेच या शिक्षकाने लैंगिक शोषण केले. भावाने कॅमेर्यासमोर बोलताना तक्रार केली आहे की, या शिक्षकाने आपल्या बहिणीवरच नव्हे तर इतर मुलींवरही अत्याचार केले आहेत. मात्र कुणीही बोलायला तयार नाहीत. या भावासह या परिसरातील अनेक तरुणांनीही या शिक्षकाबद्दल अशाच प्रकारची तक्रार केली आहे. आज हा शिक्षक पोलीस कोठडीत असला तरी या शिक्षकाला गेली अनेक वर्षे पाठीशी घालणार्या शाळा प्रशासनावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शिक्षकाच्या विरोधात सातत्याने तक्रार होत असूनही त्याच्यावर कारवाई न करणार्या शाळा प्रशासनाला पोलिसांनी मुक्त का सोडले आहे? असा सवाल पीडितेचा भाऊ आणि या शाळेतील अनेक विद्यार्थी विचारत आहेत.
मालक आणि वकील
दोन्ही भाजपाचे?
बदलापूरच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा सरकारने आज केली. हेच उज्ज्वल निकम नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढले होते. बदलापूरचा घृणास्पद प्रकार ज्या आदर्श शाळेत घडला ती शाळाही भाजपाच्या नेत्याची आहे. त्यामुळे शाळेचा मालक आणि वकील दोघे भाजपाचेच असल्यावर न्याय मिळेल का, असा सवाल विचारला जात आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी निकम यांनी विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिला. मात्र निवडणुकीत हरल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने त्यांची पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. म्हणूनच भाजपाचा वरदहस्त लाभलेले निकम भाजपाच्याच नेत्याच्या विरोधात बाजू मांडतील का, याची खात्री नाही, असे म्हटले जात आहे.
आज जेल, कल बेल फिर वही पुराना खेल!
छत्रपती संभाजीनगर येथील ओहर गावात काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या चुलत भावाने दुचाकीवरून येत मुलीच्या कुटुंबियांना जाहीरपणे धमकी देत म्हटले की आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल. यामुळे पीडित मुलीचे कुटुंब दहशतीखाली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 18 ऑगस्ट रोजी ओहर गावात मेकॅनिक असलेल्या कासिम यासीन पठाण या तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला आणि धमक्यांना कंटाळून एका 16 वर्षीय तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा नोंदवला होता. पण केवळ दोघांनाच अटक केली होती. मोकाट असलेल्या उर्वरित आरोपींनी आणि त्यांच्या मित्रांनी आता पीडितेच्या कुटुंबियांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी तिच्या घरासमोर येऊन कुटुंबाला चाकू आणि तलवारी दाखवून धमकावले.
मुंबईतील नागपाडामध्ये
8 वर्षीय मुलीचा विनयभंग
नागपाडा परिसरात 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. चिमुरडीला कानातले दाखवण्याच्या नावाखाली नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपी हा कानातले विक्री करणारा आहे. तो नागपाडा परिसरात व्यवसाय करत असतो. एका अल्पवयीन मुलीला त्याने कानातले दाखवण्याचा बहाणा करून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार त्या परिसरातील एका महिलेने पाहून आरडाओरडा केला. त्या महिलेने आरडाओरड केल्यावर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, स्थानिकांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांना फोन करून त्याला ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अकोल्यात शिक्षकाकडून सहा विद्यार्थिनींचा विनयभंग
एका शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. काजीखेड गावात जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने आठवीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केला. व्हिडिओ दाखवत असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. ही खळबळजनक घटना काल संध्याकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकाराने जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 26 ऑगस्टपर्यंत शिक्षकाला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिकमध्ये अत्याचाराच्या तीन घटना!
नाशिक जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. नाशिकच्या सिन्नरमधील मरोळ गावात साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ शोध घेऊनही चिमुकली कुठेच सापडली नव्हती. त्याचवेळी हा तरुणही बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने सर्वांचा संशय बळावला. त्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेत नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नाशिकच्या वडनेर भैरव इथे एका 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वडनेर भैरव येथील 7 वर्षांच्या मुलाचे 15 ऑगस्टला ध्वजारोहण आटोपून घरी परतताना कोकणटेंभी येथील एका 20 वर्षीय तरुणाने अपहरण केले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत शनिवारी 17 ऑगस्टला आरोपीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहाच्या शवविच्छेदन तपासणीत चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिमुकल्याला न्याय मिळावा यासाठी रविवारी 18 ऑगस्टला ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत सायंकाळच्या सुमारास गावातून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. मोर्चात मुले, मुली, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्याच्या तीन बहिणींनी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर तिसरी घटना चांदडमध्ये घडली आहे. दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे चांदवडमधून अपहरण झाले होते. त्या मुली मालेगाव बसमध्ये बसलेल्या एका महिलेला आढळल्या. मुली बेपत्ता आहेत त्याबाबत महिलेने सोशल मीडियावर पाहिले होते. त्यामुळे त्या महिलेने त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना बसमधून उतरवले व पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस व मुलींच्या आईवडिलांनी मुलींना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.