बदलापूरचा उड्डाणपूल खड्ड्यात! कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका! वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बदलापूर- बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे खड्डे बुजवण्यात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. हे खड्डे भरण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दत्ता गायकवाड यांनी दिला आहे.

यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वाहनांची संख्या वाढत चालल्याने आणखी दोन उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. याबाबत कुणी विचार करत नसल्याने या एकमेव उड्डाणपुलावर वाहतुकीचा भार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत निदान हा पूल खड्डेमुक्त तरी ठेवावा अशी अपेक्षा आहे.मात्र नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या उड्डाणपुलावर सतत खड्डे पडत आहेत.विशेष म्हणजे अलीकडेच भरलेले खड्डे पावसात वाहून गेल्याने हा उड्डाणपूल पुन्हा खड्ड्यात गेला आहे. तरी आता संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही या निवेदनात दत्ता गायकवाड यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top