मुंबई – बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. यामुळे शाळेचे फरार असलेले संस्थापक आपटे आणि शाळा प्रशासनाला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेला कायमचे गप्प केले का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात भररस्त्यात पोलिसांनी आरोपीला ठार केल्याच्या या घटनेमुळे खळबळ माजली असून अनेकांना या घटनेचा धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाणे
पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे.
अक्षय शिंदे याने स्वत:वर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली, असे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र नंतर स्पष्ट झाले की, पोलिसांनी एन्काउंटर करून अक्षय शिंदेला ठार मारले आहे. पोलिसांच्या गाडीतून जाताना अक्षय शिंदेने सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे पिस्तूल हिसकावून घेतले आणि स्वत:वर गोळीबार करून आत्महत्या न करता व्हॅनमधील पोलिसांवर गोळीबार केला. त्यातील दोन गोळ्या वाया गेल्या व तिसरी गोळी पोलिसाच्या पायात घुसली. यानंतर स्वत:च्या संरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली. चेहर्यावर गोळी लागून अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, असा घटनाक्रम पोलीस सांगत आहेत. मात्र यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अक्षय शिंदेला गप्प करण्यासाठी त्याचे एन्काउंटर केले, असा आरोप विरोधकांपासून सर्वजण
करीत आहेत.
अक्षयला आज संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ट्रान्झिस्ट रिमांडवर तळोजा तुरुंगातून ठाण्याला क्राईम ब्रँचच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले जात होते. अक्षयविरोधात त्याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची चौकशी करण्यात येणार होती. मात्र मुंब्रा बायपास रस्त्यावर पोलिसांची व्हॅन आली असताना अक्षयने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावले. त्यानंतर या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोन गोळ्यांचा नेम चुकला. परंतु एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केला. त्यात त्याच्या चेहर्यावर गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. तर पायाला गोळी लागल्याने जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मात्र ठाण्याच्या ज्युपिटर या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत देण्यात आली नाही. त्यामुळे हा लपवाछपवीचा प्रकार असावा असा संशय बळावला.
अक्षयच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अक्षयसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नेले जात असताना पुरेसा बंदोबस्त नव्हता का? अक्षयच्या हातात बेड्या नव्हत्या का? पोलिसाच्या कंबरेला लावलेले रिव्हॉल्व्हर अक्षयने इतक्या सहज कसे खेचले? पोलीस आणि अक्षय यांच्यात झटापट झाली का? अक्षयला रिव्हॉल्व्हर चालवण्याचे ज्ञान होते का? त्याने जवळून मारलेल्या गोळ्याही पोलिसांना का लागल्या नाहीत? तर पोलिसांनी झाडलेली गोळी नेमकी त्याच्या डोक्याला कशी लागली? पोलिसांनी त्याच्या पायावर गोळ्या का झाडल्या नाहीत?
अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी दिलेली प्रतिक्रिया पोलिसांना आरोपीच्या पिंजर्यात उभी करणारी आहे. वडील म्हणाले की, मी आज 3.30 वाजता त्याला भेटून आलो. अक्षय शिंदेला पैसे घेऊन मारून टाकले आहे. त्याला फटाक्याची बंदूक माहीत नाही. मग तो पोलिसांची बंदूक घेऊन फायर करू शकणार का? पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितले नाही. आता मी बातमी पाहिली तेव्हा आम्हाला कळले. आम्हालाही आता
गोळ्या घाला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राज्यात खळबळ उडाली असून, विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था संपली आहे, हे धक्कादायक आहे. अक्षय आता साक्ष देऊ शकत नाही. त्याला मारून टाकण्यात आले आहे. हे प्रकरण कुणी दाबले याची चौकशी केली पाहिजे. ही घटना घडवली आहे. या एन्काउंटरमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. राज्यातली पोलीस यंत्रणा इतकी कुचकामी झाली आहे का? काय चालले आहे या महाराष्ट्रात? या प्रकरणात सत्य पुढे यायला हवे होते. पण अक्षयला मारून टाकले. त्याचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न कुणी केला? आरोपीला मारण्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे हे
तपासले पाहिजे.
शिवसेना नेता सुषमा अंधारे म्हणाल्या की, अक्षयचे एन्काउंटर झाले आहे. पोलीस स्वसंरक्षणाचा बनाव करत आहेत. संस्थाचालक आपटे फरार का आहे? अक्षय शिंदेच्या आईने जबाब दिला आहे त्याचे काय? या प्रकरणात पोलिसांची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद होती. अक्षय शिंदे हिंस्त्र होता का? त्याची पार्श्वभूमी तशी होती का? जर होती, तर वेगळी काळजी का घेतली नाही? दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? या प्रकरणातील पोलीस निलंबित झाले पाहिजेत. संबंधितांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आरोपीला पकडण्यात आधीच उशीर केला होता. संस्थेतील पदाधिकारी जे आरोपी आहेत तेदेखील अजून फरार आहेत. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएस पर्यंत भाजपाच्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. गोळी पोलिसांनी झाडली का अशीही चर्चा आहे. पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि वास्तविकता लोकांसमोर यावी अशी माझी मागणी आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याने न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झालीच पाहिजे होती याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना पोलीस अधिकार्याची बंदूक हिसकावून घेऊन आरोपी गोळीबार करतो ही बाब अत्यंत गंभीर आहे.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस अधिकारी इतके बेसावध आणि निष्काळजीपणे आरोपींना घेऊन जातात का? एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या तरी आदेशावरून त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे का? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काउंटर केले आहे का? पोलीस कस्टडीत आरोपींना संपवून प्रकरण दाबण्याचा उत्तरेतील राज्यातला पॅटर्न महाराष्ट्रात आणला जात
आहे का?
अक्षय शिंदे एन्काउंंटर प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्याला पत्नीवरील अत्याचार प्रकरणी क्राईम ब्रँचचे अधिकारी चौकशीअंती नेत असताना त्याने पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. जे विरोधक पूर्वी अक्षयला फाशी द्या अशी मागणी करीत होते ते आता आरोपीची बाजू घेत आहेत. पण जखमी पोलीस अधिकार्याबद्दल काही बोलत नाहीत. जे पोलीस उन्हातान्हात जनतेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात त्यांच्याविषयी विरोधकांना काहीच वाटत नाही हे दुर्दैवी आहे. ते पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून ते अशा प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करीत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला म्हणून पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि चौकशीत जे काही असेल ते समोर येईल.
अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, एसआयटीकडे भरपूर पुरावा होता. आरोपपत्र दाखल केले होते. त्याची प्रत त्याला मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही
समोर येईल.
बदलापुरात आनंदोत्सव
अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याचे समजताच बदलापुरात काही ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनीही फटाके फोडले. तर महिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. काही महिलांनी सांगितले त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली. पण त्याचबरोबर या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार आहेत त्यांनाही अटक होऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी.