सॅन फ्रान्सिस्को :
ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यातच ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार काल रात्री १२ वाजल्यापासून ट्विटरने जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, त्यांना आता पेड सर्व्हिस घ्यावी लागणार.
मस्क यांनी १२ एप्रिल रोजीच ट्विटरमधील हे बदल स्पष्ट केले होते. तसेच २० एप्रिलच्या रात्रीपासून मोफत ब्ल्यू टिकची सर्व्हिस बंद करणार असल्याचे जाहीर केले होते. पैसे मोजल्यानंतरच त्यांना ब्ल्यू टिक मिळणार आहे. तरच यूजर्सना व्हेरिफाईड अकाऊंट मिळणार आहे. दरम्यान, ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी आहे किंवा आपली ब्ल्यू टिक सर्व्हिस कायम ठेवायची आहे त्यांना आता ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन ६५० रुपयांपासून सुरू होते. ट्विटरने भारतासहीत या आधीच अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पेड सर्व्हिस सुरू केली आहे. या देशांमधील नागरिकांनी ट्विटरची पेड सर्व्हिस घेण्यासाठी मोठी रक्कमही मोजली.
भारतात अनेकांची ब्ल्यू टिक हटवण्यात आले आहेत. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रिमो मायावती, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप आमदार नितेश राणे, क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार आदींची ब्ल्यू टिक हटवण्यात आली.