बजरंगाने गदा हाणली! कमळ विखुरलं! आतातरी हरवलेला ‘विकास’ परतेल का?

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमताच्या आकड्यापेक्षाही जास्त जागा देऊन मतदारांनी केवळ भाजपालाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला संदेश दिला. भाजपच्या फोडाफोडीच्या, जातीय, धार्मिक राजकारणाला आता जनता कंटाळली असून यापुढे निवडणूक स्थानिक, लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आणि विकासाच्या मुद्यांवरच लढली जाईल, हा संदेश या निकालाने मिळाला आहे. भाजपची नंदिनी दुधापासून, बजरंगबलीपर्यंतची कोणतीच भावनिक मात्रा कामी आली नाही. बजरंगबलीने त्याच्या भक्तीच्या वाराच्याच दिवशी शनिवारी भाजपवर गदा हाणून सणसणीत प्रहार केला आणि भाजपचे कमळ विखुरले. यानंतर हरवलेला ‘विकास’ पुन्हा पुढे करून भाजपा विकासाच्या मुद्यावर येईल का? हा प्रश्‍न आहे. त्याचवेळी लोकसभा जिंकण्यासाठी भाजपा येत्या काळात मोठे क्रांतिकारी निर्णय घेईल अशी चर्चा आताच सुरू झाली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने 224 पैकी 136 जागा देऊन काँग्रेसला पूर्ण बहुमताच्याही पुढे नेले. भाजपला केवळ 65 जागांवर आणून ठेवले. तर जदयूच्याही जागा घटून 19 पर्यंत आल्या. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान मोदींनी 20 प्रचारसभा घेतल्या. 36 कि.मी.चा सर्वात लांब रोड शो केला. बजरंगबलीचा आधार घेऊन मंदिरांत हनुमान चालिसाचे पठण केले. पण मतदारांनी भाजपाला घरचा रस्ता दाखवला. उलटपक्षी कर्नाटकातल्या ज्या 8 जिल्ह्यातून राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली तिथुन काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आल्या. लिंगायत समाजाचे नेते येडियुरप्पा यांचा भाजपाने अपमान करून त्यांना केंद्रात पाठवले, यामुळे लिंगायत समाज नाराज झाला. हे लक्षात आल्यावर भाजपाने येडियुरप्पा यांना सन्मान देण्याचा खूप प्रयत्न केला. स्वत: अमित शहा त्यांना भेटायला आले. पण उपयोग झाला नाही. लिंगायत समाज भाजपाच्या विरोधात गेला. येडियुरप्पा यांच्या अधिकाराखालील सर्व मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. याशिवाय ओबीसी, दलित, मुस्लीम मतेही बजरंग दलाच्या विषयामुळे काँग्रेसच्या पारड्यात पडली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. कारण कर्नाटक हे त्यांचे मूळ राज्य आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काळातील विकासाच्या संकल्पनेवर भर देत केलेला प्रचार, छोट्या उद्योगधंद्यांचा विकास आणि शेतीला मदत करण्याची मांडलेली संकल्पना लोकांना भावली. याउलट नंदिनी विरुद्ध अमूल दुधाचे राजकारण, हनुमान चालिसाच्या कानठळ्यांनी मतदारांना भाजपपासून दूर केले. अमित शहांसह देशातील सर्वच राज्यातील भाजपचे दिग्गज नेते कर्नाटकात तळ ठोकून बसले होते. महाराष्ट्रातील नेतेही प्रचाराला उतरवले. रोज भाजपा नेत्यांच्या झुंडी विमानाने कर्नाटकात उतरत होत्या. त्याचाही उपयोग झाला नाही. मतदारांनी काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. भाजप नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पराभव मान्य करत म्हणाले की, आम्ही उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकलो नाही. पराभवाचे विश्लेषण करू आणि चुका सुधारून लोकसभा निवडणुकीत नव्या जोमाने जिंकू. उद्या काँग्रेस विधिमंडळाची बैठक असून त्यात मुख्यमंत्र्यांची निवड होईल.
पहिल्या कॅबिनेटमध्ये आश्वासनपूर्ती
काँग्रेसपुढे आता निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पाळण्याचे आव्हान आहे. बजरंग दल, पीएफआयवर बंदी घालू, महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा 2 हजार रु. देऊ, बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3 हजार रु., प्रत्येक कुटुंबाला दरमहा 200 युनिट मोफत वीज ही आश्वासने पहिल्या कॅबिनेट बैठकीतच पूर्ण करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
मुख्यमंत्री कोण?
माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोघांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळू शकण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोघांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

अपेक्षित यश मिळाले नाही – देवेंद्र फडणवीस
कर्नाटकमध्ये 1985 पासून प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पराभूत होऊन अन्य पक्षाचे सरकार येते. 2018 मध्ये भाजपच्या 104 जागा आल्या होत्या. आमच्याकडे 36 टक्के मते होती आणि आमची 0.4 टक्के मते कमी झाली आहेत. आमच्या 40 जागा कमी झालेल्या आहेत. जेडीएसला 18 टक्के मते होती. ही पाच टक्के जेडीएसकडे गेली आहेत. भाजपची मते कमी झालेली आहेत.
2024 सालच्या विजयाची ही नांदी – उद्धव ठाकरे
कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले. कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. 2024 सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन.
विकासाच्या मुद्द्यावर भाजप
फेल ठरले – अशोक चव्हाण

काँग्रेसनं लोक कल्याणकारी योजनांचा अवलंब केला आहे. त्याला जनतेने प्रतिसाद दिला आहे. डबल इंजिन रूळावरून घसरले आहे महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. लोकांच्या प्रश्नांसदर्भात कुठला पक्ष काय करतो, काय बोलतो ते मतदारांना यात स्वारस्य असते. स्वयंपाकासाठी लागणार्‍या सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत. तर दुसरीकडे बाजूला काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना आकर्षक वाटला. यात महिलांसाठी पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून विनामुल्य प्रवास करता येईल.
विरोधी पक्षाची भूमिका बजावू

  • येडियुरप्पा, भाजप नेते
    कर्नाटक निवडणूक निकालावर येडियुरप्पा यांची प्रतिक्रिया भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा म्हणाले, लोकांच्या मतदानाच्या हक्काचा आदर करा. विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कार्यकर्त्यांसोबत बसून जिथे चूक झाली तिथे विचारमंथन करू. भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले आहे. त्यांचे आभार.
    निवडणुकीआधी भाजपचा अंत
  • ममता बनर्जी
    परिवर्तनाच्या बाजूने निर्णायक जनादेश दिल्याबद्दल कर्नाटकच्या जनतेला माझा सलाम! क्रूर हुकूमशाही आणि बहुसंख्याक राजकारणाचा पराभव होतो. 2024 च्या निवडणुकीआधी भाजपच्या अंताची सुरुवात झाली आहे.
    बजरंगबलीनेच गदा फिरवली
  • जयंत पाटील
    बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणार्‍या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली. जनतेला भ्रष्टाचार, जातीधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत.
    लढाई तिरस्काराने नाही तर प्रेमाने जिंकली- राहुल गांधी
    कर्नाटकमधल्या काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलशाही दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीब काँग्रेससोबत उभे राहिले. हेच चित्र देशात दिसणार आहे. आम्ही ही लढाई तिरस्काराने नाही तर प्रेमाने जिंकली. हा सर्वात आधी कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही पाच आश्वासने दिली होती आम्ही ही आश्वासने पहिल्या कॅबिनेट बैठकीतच पूर्ण करू.
    भाजपाला धडा शिकवला
    शरद पवारांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कर्नाटक विजयावर प्रतिक्रिया देत म्हटले की, मी कर्नाटकच्या जनतेचे आणि काँग्रेसचे अभिनंदन करतो. भाजपाला जनतेने धडा शिकवला. कर्नाटक, तामिळनाडू आंध्रप्रदेश, झारखंड, पंजाब, दिल्ली, प.बंगाल, केरळ या राज्यांत भाजपाचे सरकार नाही. भविष्यात हेच वळण दिसेल. लोकांनी काँग्रेसला इतके भरघोस यश दिले की, भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाची संधीच ठेवली नाही.
    बजरंगबली कोणासोबत हे
    कर्नाटकच्या निकालातून स्पष्ट
    जितेंद्र आव्हाडांचे खोचक ट्विट

    राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले की, हनुमान चालिसामध्ये एक कडवे आहे. महाबीर बिक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी..! अर्थात, महावीर बजरंगबली हे पराक्रमी आहेत. ते दुर्जनांचे निर्दालन करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात. थोडक्यात आज खुद्द बजरंगबलींनी देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे.
    काँग्रेसचे अभिनंदन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
    कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मी काँग्रेसचे अभिनंदन करतो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.कर्नाटक निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार्‍या सर्वांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीला माझा सलाम.

कर्नाटकाचा निकाल, महाराष्ट्रात जल्लोष
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसने जल्लोष केला. बाळासाहेब थोरातांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विजयाचा संगमनेरात जल्लोष केला. पेढे वाटून फुगडी खेळत कर्नाटकचा विजय साजरा केला. पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील मारुतीच्या मंदिरात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आरती करून जल्लोष साजरा केला. नाशिक शहरात देखील शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महागाईच्या मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसने जल्लोषाच्या वेळी सिलेंडर समोर ठेऊन विजय साजरा केला. एका कार्यकर्त्याने चक्क सिलेंडर उचलून घेत ढोल वादनावर नृत्यही केले.

पक्षीय बलाबल (एकूण जागा -224)
भाजपा – 65
काँग्रेस – 136
जदयू – 19
इतर – 4

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top