छत्रपती संभाजीनगर – राजकारणात सत्ताधारी-विरोधकांची नावे घेऊन उणीदुणी काढली जातात. पण सध्या राजकारणाने इतकी टोकाची तिरस्काराची पातळी गाठली आहे की, विरोधकांची किंवा त्यांच्या पक्ष-आघाडींची नावेही सत्ताधार्यांना नकोशी झाली आहेत. याचाच प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या वाघिणीच्या बछड्याच्या नामकरण सोहळ्यात आला. चिठ्ठ्या काढून वाघिणीच्या बछड्यांची नावे ठेवली जाणार होती, पण चिठ्ठीत ’आदित्य’ हे नाव आल्याने ती चिठ्ठी मागे घेण्यात आली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला. या प्राणिसंग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिता हिने 7 सप्टेंबर रोजी तीन पांढर्या बछड्यांना जन्म दिला. आज सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिठ्ठी काढत बछड्यांचे नामकरण केले. मुख्यमंत्र्यांनी पहिली चिठ्ठी काढली त्यात ‘श्रावणी’ हे नाव आले. श्रावणातील ती श्रावणी असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यानंतर दुसरी चिठ्ठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काढली. त्यात ‘आदित्य’ हे नाव आले. नाव पाहताच अजित पवार यांना हसू आवरले नाही. शेजारीच उभे असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी ती चिठ्ठी मागे घ्यायला लावली आणि आदित्य नाव आल्याने चिठ्ठी मागे घेतली, असे जाहीरही केले. मग पवारांनी दुसरी चिठ्ठी काढली त्यात ‘विक्रम’ हे नाव होते. त्याची घोषणा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणखी एक चिठ्ठी उचलून ‘कान्हा’ हे नाव काढले.
खरे पाहता ‘आदित्य यान’ आणि ‘विक्रम लँडर’ यावरून ही नावे चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आली असण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नामसाधर्म्यामुळे ते बाजूला ठेवून दुसरी चिठ्ठी काढण्यात आली. आदित्य नाव आल्याने चिठ्ठी मागे घेतली, असे मुनगंटीवार यांनी जाहीरही केले. त्यामुळे या नामकरण प्रकरणावर टीकेची झोड उठली.
या घटनेवर ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, ‘आदित्यला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हे कोणताही आदित्य लपवू शकत नाहीत. तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचे सर्वांना माहीत आहे. त्याचे नाव कोणाला असेल किंवा नसेल फरक पडत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तरी फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी असाच तिरस्कार करावा. आदित्य अजून तळपेल.’
मुनगंटीवार म्हणाले, ‘जंगलामध्ये राहणार्या वाघाच्या बछड्यांना नाव दिले जात नाही. असे नाव फक्त उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना दिले जाते. पण कोणतेही नाव देताना कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत हे देखील पाहिले पाहिजे.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दोन चिठ्ठ्या आल्या म्हणून एक मागे घेतली,’ असे माध्यमांना सांगितले.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. खासदार जलील म्हणाले, ‘वाघाच्या बछड्याला काय नाव द्यावे हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, राजकारण किती खालच्या पातळीवर गेले हे यातून तुम्हाला
पाहायला मिळेल.
बछड्याचे नामकरण, पण ‘आदित्य’चे नाव निघताच चिठ्ठी बदलली! भाजपचा राजकारणाचा ‘विक्रम’
