‘बंबई मेरी जान’ वेब सीरिजच्या नावावरून मनसे आक्रमक

मुंबई – अभिनेत्री कृतिका कामरा आणि अविनाश तिवारीची बंबई मेरी जान ही वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १९७० च्या दशकात मुंबईतील वाढत्या माफियाराजवर ही वेबसीरिज आधारित आहे. निर्माता दिग्दर्शकांनी ‘बंबई’ हे नाव बदलावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करत हे नाव बदलण्यास भाग पाडू असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. यापूर्वीदेखील चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बंबई’ या नावावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेत अनेक दिग्दर्शकांना हे नाव बदलण्यास भाग पाडले होते.

अमेय खोपकर यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात की, नावात काय आहे? असे शेक्सपियर म्हणून गेला. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा’तच सर्व काही आहे असे वाटते. इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली. तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या इंडिया ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग ‘भारत’ नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई’च्या नाव बदलण्याच्या संदर्भात इतके उदासीन कसे? ‘बॉम्बे’ आणि ‘बम्बई’ चे ‘मुंबई’ करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले, हे आपण विसरलो का राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले. तरीही अमराठी आगंतुकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे. अजून मी ही वेब सिरीज पाहिलेली नाही. बघतोच! आणि मुंबईऐवजी ‘बंबई’ वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो. पटले तर ठीक आहे. अन्यथा खळखट्याक!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top