कोलकाता –
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘मोचा’ चक्रीवादळ धडकू शकते. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पाच दिवस सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याने पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर प्रदेशात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते. पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, अमेरिकेचे हवामान अंदाज मॉडेल ‘ग्लोबल फोरकास्ट सिस्टम’ आणि युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट यांनीही बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.