बंगळुरूचा दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय

बंगळुरू – आयपीएलमध्ये शनिवारच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात विजयकुमार वैशाक याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी)दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 151 धावांपर्यंत मजल मारू शकला. दिल्लीला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. विजयकुमारने आयपीएल पदार्पणात तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघाने दिल्लीला 175 धावांचे आव्हान दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या एका धावेवर पृथ्वी शॉ धावबाद झाला. त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर मिचेल मार्शही गोल्डन डकचा शिकार झाला. एका धावेवर दिल्लीचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. मिचेल मार्श याला वेन पर्नेलने तंबूत धाडले. त्यानंतर संघाची धावसंख्या तीन झाल्यानंतर यश धुलही तंबूत परतला. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. दिल्लीची अवस्था बिकट झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेविड वॉर्नर यांनी डाव सावरला. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी संघाची धावसंख्या हालती ठेवली.
आरसीबीकडून पदार्पण करणार्‍या विजयकुमार वैशाकने डेविड वॉर्नरला बाद केले. सहा षटकांत 32 धावांच्या मोबदल्यात दिल्लीने चार विकेट गमावल्या होत्या. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मनिष पांडेने दुसर्‍या बाजूला दमदार प्रदर्शन केले. मनिष पांडेने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अर्धशतकी खेळी करत दिल्लीला विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पांडेला दुसर्‍या बाजूने साथ मिळाली नाही. 50 धावांवर मनिष पांडे बाद झाला. त्यानंतर अभिषेक पोरेल पाच धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 14 चेंडूत 21 धावांवर बाद झाला. मनिष पांडे याने 38 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. दिल्लीने 98 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. आरसीबीकडे सामना झुकला होता. अमन खान याने अखेरीस दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 150 च्या पार नेली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top