सॅक्रामेंटो – ‘फेसबुक’ची पालक कंपनी ‘मेटा’ आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. याच आठवड्यात ही कपात होण्याची शक्यता आहे. ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मार्चमध्येच यासंबंधीचे संकेत दिले होते. पुढील महिन्यात आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची आमची योजना आहे, असे त्यांनी सांगितले होते. कंपनीने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ११ हजार लोकांना कामावरून काढले होते.
‘मेटा’ परिवारातील ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘व्हॉट्सॲप’, ‘रिॲलिटी लॅब्ज’ आणि ‘क्वेस्ट हार्डवेअर’ अशा सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीची झळ बसणार आहे. यासंबंधीचा एक मेमो कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना पाठवला आहे. दरम्यान, ‘मेटा’मधील एक वरिष्ठ अधिकारी लोरी गोलर यांनी सांगितले की, ‘मेटा’साठी योगदान देणाऱ्या काही मित्र व सहकाऱ्यांना आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. हा एक कठीण काळ आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी २०२३ हे ‘कार्यक्षमता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्मचारी कपात केली जात आहे.