मुंबई – माझ्या मुलीचा खटला दोन वर्षांहून अधिक काळ जलदगती न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. अजून तिच्या अस्थी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. मी अंत्यसंस्कार करू शकलो नाही. आम्हाला न्याय मिळाला असे म्हणता येईल का? फास्ट ट्रॅक कोर्टात खटले नेले तरी जर राजकीय इच्छाशक्ती नसेल तर न्याय मिळत नाही. मयत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर ढसाढसा रडत ‘नवाकाळ’ प्रतिनिधी नेहा पुरवशी बोलत होते.
वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची 2022 मध्ये तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने दिल्लीत निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. मयत श्रद्धाचे वडील विकास वालकर मागील दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. मात्र अजूनही वालकर कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. घटना घडताच तातडीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यात आले, पण त्यानंतर जनक्षोभ शांत होताच खटलाही शांत झाला.
आता अशा घटना रोखण्यासाठी तसेच देशभरातील तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या वडिलांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ते आपल्या मुलीला श्रद्धांजली वाहत आहेत. श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक कार्यांबरोबर मुलींमध्ये जनजागृती करणे, त्यांचे समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी काम करीत असल्याची माहिती श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी दिली.
ते म्हणाले की, असे हत्याकांड घडले की, लोक पेटून उठतात. देशभरातून संताप व्यक्त होतो. त्या रेट्यामुळे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे दिले जाते. मात्र हे प्रकरण जलदगती न्यायालयात असूनही अनेक तांत्रिक गोष्टींमुळे निकाल अद्यापही लागलेला नाही. या विलंबामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष देखील तिच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी मिळू शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही राजकीय नेत्यांना सांगितले की, आम्हाला न्याय मिळवून द्या. तेव्हा ते प्रकरण न्यायालयात असल्याने काही करण्यास असमर्थता व्यक्त करतात. आम्ही सामान्य माणसे आहोत, काहीच करू शकत नाही, पण जलदगती न्यायालयात खटला चालला म्हणजे तो वेगाने चालेल आणि न्याय मिळेल असे काही नसते. बदलापूर प्रकरणातही लोकांच्या भावना शांत झाल्या की, प्रकरण थंड पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, हे प्रकरण जलदगती न्यायालयात असूनही या प्रकरणाचा निकाल लागला नसल्याची खंत श्रद्धाच्या वकील अड सीमा कुशवाहा यांनी व्यक्त केली.