फलटण – सातारा जिल्ह्यातील फलटण-खुंटे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालविताना खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता आहे. हे खड्डे न भरल्यास या खड्ड्यात वृक्षारोपण केले जाईल, असा इशारा खुंटे गावचे माजी उपसरपंच व राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे-पाटील यांनी दिला आहे.
राजेंद्र खलाटे पाटील म्हणाले की,फलटण-खुंटे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहने चालविताना वाहन चालक मेटाकुटीला येत आहेत. रस्त्याची झालेली चाळण, तुटलेल्या साईडपट्टया, खड्ड्यात साठलेले पावसाचे पाणी, वाढलेली झाडेझुडपे, वेडीवाकडी वळणे यामुळे रस्त्यावरून येणे- जाणे म्हणजे हमखास अपघात किंवा हाडांची व्याधी लागून घेणे अशी झाली आहे.तरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाने ताबडतोब या रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टया न भरल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ग्रामस्थांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन छेडले जाईल.