फरीदाबाद – हरियाणातील फरीदाबादमध्ये एका खासगी टँकरमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. मुस्कान (17) असे मृत मुलीचे नाव असून ती एसजीएम नगर येथील रहिवासी होती. मुलगी एक दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती.
टँकरच्या चालकाला पाण्याच्या पाईपमध्ये काही तरी अडकल्याचे लक्षात आले. त्यानंतर चालकाने टँकरमध्ये चढून पाहिले असता आत मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर चालकाने दिलेल्या माहितीनंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. टँकर कापून मुलीचा मृतदेह बाहेर काढला. मुस्कानचे वडील उस्मान यांनी सांगितले की, मुलगी गेल्या काही दिवसांपासून काही कारणामुळे डिप्रेशनमध्ये होती. तिला कितीतरी वेळा विचारायचा प्रयत्न केला, ती काहीच बोललीच नाही. रात्री साडेनऊ वाजता ती न सांगता उशिरा घराबाहेर पडली आणि त्यानंतर घरी परतलीच नाही. त्यांनी शेजारी आणि नातेवाइकांमध्ये तिचा शोध घेतला, मात्र पत्ता लागला नाही.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी महावीर कुमार यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये कसा पोहोचला, याचा तपास सुरु केला आहे. आम्ही हत्येच्या अंगानेही चौकशी करत आहोत.