मुंबई – महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळ स्थापनेत सतत दिल्लीला धाव घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरवताना धाप लागल्यानंतर आता खाती वाटपाचा निर्णयही अमित शहाच घेणार आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला गेले. उपमुख्यमंत्री शिंदे नाराजीचा पवित्रा कायम ठेवत दिल्लीत न जाता ठाण्यातच थांबले आहेत. मात्र अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी 14 डिसेंबरला नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल असे म्हटल्याने तोपर्यंत हा पेच थोडातरी सुटेल अशी आशा आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनात तरी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा महायुतीचा प्रयत्न आहे. परंतु घटक पक्षात मंत्र्यांची नावे आणि खात्यांबाबत एकमत होत नसल्याने याला विलंब होत आहे. या संदर्भात काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एक ते दीड तास बैठक झाली. मात्र त्यातही निर्णय न झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिल्लीला रवाना झाले. परंतु एकनाथ शिंदे दिल्लीला न गेल्याने मंत्रिपदे आणि खातेवाटपाबाबत शिवसेना अजूनही समाधानी नाही, हे स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा अधिक आहे. मंत्रिमंडळात आधीच्या मंत्र्यांना संधी न देता नवीन चेहर्यांना संधी देण्याची मागणी शिवसेना आमदारांकडून होत आहे. काही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदे देण्यास पक्षातील आमदारांचाच विरोध आहे. अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नका, अशी मागणी शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी केली आहे. या नेत्यांकडे गेल्यावर कामे होत नाहीत. ते केवळ आश्वासने देतात. प्रत्यक्षात कामे करत नाहीत, अशी या आमदारांची तक्रार आहे. तर शिवसेनेतील काही आमदारांच्या नावाला भाजपाचाही विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्री नको आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही मंत्र्यांना यावेळी वगळले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे असेल तर गृहमंत्रिपद हे शिवसेनेला देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी सतत केली आहे. आजही ते या मागणीवर ठाम आहेत. मात्र, शिवसेनेला गृहमंत्रिपद देण्यास भाजपा तयार नाही. त्यांना नगरविकास खात्यावर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे. एकनाथ शिंदे गटाला 13 आणि अजित पवार गटाला 11 मंत्रिपदे दिली जातील अशी फक्त चर्चा आहे .