नागपूर – उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे आमचे आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी दिला जात नाही,असा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर राज्यात बराच वादंग उठला होता.हा वाद शांत होत नाही तोच आज नागपुरात माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर नवा आरोप केला.
देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी विकास प्रकल्पांच्या फाईलवर सह्या करत नाहीत. विविध योजनांच्या निधीसाठी आम्ही सातत्याने निधीची मागणी करतो. काटोल-नरखेड हा मतदारसंघ आमच्याकडे आहे. फडणवीसांच्या दबावामुले येथील अनेक विकास कामे निधीअभावी रखडले आहेत,असे देशमुख म्हणाले.
फडणवीसांनी विकास निधी रोखला! आमदार अनिल देशमुख यांचा आरोप
