दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करीत त्यांना डिवचले. ते म्हणाले की, कोकणातील माणसे ही बाहेरून काटेरी आणि आतून गोड आहेत. त्यामुळे ती विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील. उबाठाला कोकणात एकही जागा मिळणार नाही. हे बाळासाहेब ठाकरेंचे कोकण आहे. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे. 23 तारखेला गुलाल उधळून आपण दिवाळी साजरी करायची आहे. एवढे फटाके फोडा की त्याचा आवाज वांद्य्रापर्यंत पोहोचला पाहिजे.
विधानसभा निवडणुकीला केवळ चार दिवस उरले असल्याने प्रचाराला वेग आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आज दापोली, गुहागर आणि सावंतवाडीत सभा झाल्या. दापोली येथील सभेत ते म्हणाले की, दापोलीमध्ये आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांची विकासकामे आपल्या सरकारने येथे केली आहेत. मात्र यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटतच नव्हते, त्यामुळे निधी मिळणार कुठून? मात्र आता घेणारे सरकार नाही तर देणारे सरकार आहे. राज्यांमध्ये आधीच महायुतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. उद्धव ठाकरे मला म्हणाले की दहा दिवस थांबा, मी तुम्हालाही जेलमध्ये टाकतो. कोणाला धमक्या देत आहात? एकनाथ शिंदे पोकळ धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही एकनाथ शिंदेंना हलक्यात घेतले. पण काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवून आणला. उबाठाचे बालेकिल्ले जनतेने उद्ध्वस्त केले. केवळ शिवसेना आणि धनुष्यबाणाला लोकांनी साथ दिली. उबाठाला कोकणात एकही जागा जिंकता येणार नाही. कारण हे कोकण बाळासाहेबांच्या विचारांचे आहे. येथील मतदार बाळासाहेबांना मानणारा आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे लोकदेखील आमच्याच सोबतीला आहेत.
एकनाथ शिंदेंनी यावेळी बॅग तपासणीवरूनही उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलत आहे? निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांचे काम करत आहेत. बॅगा तपासत आहे. परंतु, त्यांना बॅगा पुरत नाहीत, त्यांना खोके पुरत नाही. त्यांना कंटेनर लागतात. ते विदेशात पाठवले जातात. नंतर सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांना चिमटा काढला. ते म्हणाले की, मी दीपक केसरकरांना सांगेन की सावंतवाडीचा परिसर आणखी सुंदर करा. कारण सौंदर्य दृष्टी असलेले नेते कमी आहेत. काही लोक नुसते फोटोग्राफी करत हिंडतात आणि उठता बसता रोज शिव्याश्राप देतात. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर त्यांना कॅमेरा घेऊन जंगलात जाऊन फोटोग्राफी करावी लागेल.
आनंद दिघेंच्या उल्लेखाने
सिंधुदुर्गातील बॅनरची चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी कोकणात आले असतानाच सिंधुदुर्गात लागलेल्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले. मुंबई-गोवा महामार्गावर लागलेल्या या बॅनरवर ’मुख्यमंत्री उत्तर द्या’ असे आव्हान देत मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आनंद दिघेंची हत्या केली होती का? बाळासाहेबांनी सोनू निगमला ठार मारण्याचा प्रयत्न केला का? बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर किती जणांच्या हत्या झाल्या? ऐश्वर्य ठाकरे कुणाचा मुलगा आहे? असे प्रश्न या बॅनरवर विचारले असून त्यावर आनंद दिघे यांचा उल्लेख असल्याने बॅनरची चर्चा
होत आहे.