मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आज माजी खासदार प्रिया दत्त यांची भेट घेतली असून त्या विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रिया दत्त या मुंबई उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाच्या माजी खासदार आहेत. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांनी वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात भाग घेतला होता. याबद्दल आभार मानायला त्यांची भेट घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले असले तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान ही भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वांद्रे पश्चिम मतदार संघात प्रिया दत्त यांचे चांगले कार्य व जनसंपर्क आहे. या मतदारसंघातील मुस्लीम मतांची संख्या, प्रिया दत्त यांचे काम याचा समन्वय साधून मुंबईतील महत्त्वाची जागा जिंकण्याची तयारी मविआने केली आहे. प्रिया दत्त या आशिष शेलार यांना चांगले आव्हान देऊ शकतात असे मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्याने प्रिया दत्त निवडणूक लढण्याची शक्यता वाढली आहे. माजी खासदार सुनील दत्त व ठाकरे कुटुंबियांचे संबंध पाहता उबाठा ही जागा काँग्रेसला सोडू शकते, अशी चर्चा आहे.
प्रिया दत्त वांद्र्यात उमेदवार?वर्षा गायकवाडांनी घेतली भेट
