नवी दिल्ली – पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार तारिक फतेह यांचे सोमवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दहशतवाद, इस्लाम आणि पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका मांडणारे तारिक फतेह गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी ट्वीट करून आपल्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. नताशा फतेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाप्रेमी, सत्यप्रेमी, न्यायाचा लढवय्या अशा तारिक फतेह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांचे क्रांतिकारी काम पुढे सुरूच राहिल.
तारिक फतेह यांचा जन्म पाकिस्तानात १९४९ मध्ये झाला. १९८०च्या दशकात त्यांनी कॅनडात स्थलांतर केले. इस्लामबाबत त्यांचे पुरोगामी विचार होते. त्यांनी भारतातील भाजपप्रणित एनडीए सरकारचे समर्थन केले होते. पत्रकार आणि टिव्ही सूत्रसंचालक असलेल्या तारिक यांनी चेज़िंग ए मिराज: द ट्रॅजिक इल्यूजन ऑफ ए इस्लामिक स्टेट, द ज्यू इज नॉट माय एनिमी : अनव्हिलिंग द मिथ्स द फ्यूल मुस्लिम एंटी अशा अनेक पुस्तकांचे लेखन आणि स्तंभलेखनही केले.