प्रवासी वाहनाची कारला धडक! एक ठार, ४ जखमी

बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यात मेहकरजवळ प्रवाशी वाहनाने एका चारचाकी गाडीला धडक दिली. या अपघातात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. आज सकाळी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका निखाडे कुटुंबाच्या कारला अपघात झाला. समाेरून येणाऱ्या प्रवाशी वाहनने कारला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच हेड काॅन्स्टेबल लक्ष्मण कटक, पाेकाॅ अमाेल परिहार आणि सुनील देशमुख यांनी तातडीने जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात १० वर्षीय आर्यन गजानन निखाडेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच कार चालक अंकुश उद्धव अवचार व इतर जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या अपघातात प्रवासी वाहनातील सुयाेग परसराम भुके व अक्षय रंगारी हे सुद्धा जखमी झाले आहेत़. या प्रकरणी श्रीहरी निखाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पाेलिसांनी स्काॅर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Scroll to Top