मुंबई – मुंबई महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाने ज्याठिकाणी बसने प्रवास करता येत नाही. अशा गर्दीच्या आणि अरुंद रस्त्यावरील प्रवासासाठी मुंबईकरांसाठी ‘ वोगो ‘ ही इलेक्ट्रिक स्कूटर सुरू केली होती. मात्र आता मुंबईकरांच्या पसंतीला उतरलेली ही ‘वोगो’ सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरवापरामुळे तसेच स्कूटरच्या चोरीमुळे ही सेवा बंद केल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, ही सेवा पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी सामान्य मुंबईकरांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.
मुंबईतील अनेक भागात कायम गर्दी असते. तसेच काही ठिकाणे अरुंद आहेत,
त्याठिकाणी बस पोहचत नाही. तिथे बेस्टने ‘वोगो’ ही इलेक्ट्रिक स्कूटर सेवा सुरू केली होती. ही गाडी अर्ध्या तासाला दोन रुपये आणि त्यापेक्षा अधिक चालविल्यास प्रति मिनिट अडीच रुपये दराने भाड्याने दिली जात होती. तिचा वेग ताशी २० किमी इतका ठेवला होता. मात्र,काही दिवसांपासुन या स्कूटरमध्ये बिघाड होऊन नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्याचे हँडल ब्रेक तर कधी अॅप काम करत नव्हते, तर कित्येकदा अल्पवयीन मुलांकडून गैर पद्धतीने वापर होऊ लागला होता. इलेक्ट्रिक बॅटरीची चोरी आणि गाडीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत होते. यामुळे ही सेवा बंद करण्यात असल्याचे बेस्टच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवाशांकडून होणार्या गैरवापरामुळे अखेर बेस्टची ‘वोगो’ सेवा बंद
