नवी दिल्ली
जागतिक स्तरावर भारताकडून निर्यात होत असलेल्या वैद्यकीय उत्पादनांबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता कफ सिरप सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी झाल्यानंतरच परदेशात पाठविण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे.
भारतातून परदेशात निर्यात होत असलेले कफ सिरप सदोष असल्याने मागील वर्षी अनेकांचे मृत्यू झाले होते. यामुळे भारताच्या वैद्यकीय उत्पादनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर नवा निर्णय घेण्यात आला. परकीय व्यापार महासंचालनालयाने याबाबत सांगितले की, “१ जून २०२३ पासून कफ सिरप निर्यात करताना निर्यातदार कंपनीला सरकारी प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. संबंधित उत्पादनाची चाचणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.” इंडियन फार्माकोपिया कमिशन, प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (आरडीटीएल – चंदिगड), केंद्रीय औषध प्रयोगशाळा (सीडीएल – कोलकाता), केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (सीडीटीएल – चेन्नई हैदराबाद आणि मुंबई), आरडीटीएल (गुवाहाटी) आणि एनएबीएल या प्रयोगशाळा वैद्यकीय उत्पादनांना निर्यातीसाठी परवानगी देणार आहेत.