नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांना आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या १ लाख बुथप्रमुखांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी बुथ प्रमुखांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे, हे सांगत बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश दिले. प्रत्येक बुथ म्हणजे युद्धातील एकेक चौकी आहे, असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले की, अनेक महिन्यांपासून तुम्ही साधना केलीत, तिची सिद्धी प्राप्त होण्याचा दिवस आता आला आहे. पुढचे काही दिवस अत्ंयंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला घरोघरी जाऊन महायुतीचे व्हिजन लोकांपर्यंत पोहाचवावे लागणार आहे. मतदारांच्या घरी घाईघाईत जाऊन केवळ त्यांना नमस्कार करून, माहितीपत्रक हाती देऊन येऊ नका. त्यांच्या घरी जाऊन बसा, काही वेळ बोला, त्यांच्या मनातले जाणून घेऊन संवाद साधा. मतदाराचे मन परिवर्तन करून त्याला मतदान करायला भाग पाडणे, हे आपले काम असते. बर्याचशा मतदारांना चुकीची माहिती असते. त्यांचे काही प्रश्न असतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराशी बोलणे हे कर्तव्य आहे. भाजपाचा प्रत्येक मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचला पाहिजे. त्याने महायुतीला मतदान केले पाहिजे. निवडणूक जिंकण्याची हीच सगळ्यात मोठी रणनीती असते. युध्दात चौकी सांभाळली जाते. पोलिंग बुथ म्हणजे एकेक चौकीच असते. चौकी जिंकली की गढही जिंकला जातो. म्हणून प्रत्येक बुथ मजबूत करायला हवा. म्हणून मेरा बुथ, सबसे मजबुत हा मंत्र लक्षात ठेवा आणि तुमचा सर्व वेळ बुथ मजबुतीसाठी द्या.