मुंबई – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.अनेक नेते पक्षांतर करत आहेत.पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारून उमेदवारी पदरात पाडून घेत आहेत. भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे त्यातील एक नाव आहे .चिखलीकरांनी मागील वीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत पाचव्यांदा पक्षांतर केले आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी देत आजच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.त्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारीही देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघातून ते आपले मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. चिखलीकर मूळचे काँग्रेसचे नेते होते . त्यानंतर ते भाजपात गेले . आता ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत . माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते कट्टर विरोधक होते . अशोक चव्हाण यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस सोडली आणि भजपात प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या मागोमाग अशोक चव्हाण हेही भाजपात आल्याने त्यांची कोंडी झाली . आता भाजपाला रामराम करीत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.