मुंबई- सध्या महाराष्ट्राच्या अवकाशात निवडणुकीच्या निमित्ताने ४० हेलिकॉप्टर आणि १५ विमानांची भिरभिर सुरू झाली आहे. यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टर आणि विमानांची दिवसाकाठी किमान २५० लँडिंग होत आहेत.
यंदा निवडणूक हंगामाच्या निमित्ताने या उद्योगात ५५० कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होणार आहे. निवडणुकांमध्ये वेगाने प्रचार करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे आपल्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर केला जातो. यंदा बाहेरील राज्यातून येणारे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते हे चार्टर विमानाने येत असून, राज्याच्या अंतर्गत व दुर्गम भागातील प्रवास हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करीत आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकांत दुपारी १२ नंतर प्रचाराला सुरुवात होत होती. मात्र,यंदाची निवडणूक एकाच टप्प्यात असल्यामुळे सकाळी नऊपासूनच प्रचार सुरू होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज होत आहेत. यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ राष्ट्रीय आणि स्थानिक प्रमुख पक्षांनीच हेलिकॉप्टरचे बुकिंग केले नाही, तर अनेक छोट्या पक्षांनीदेखील आपल्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर व विमानाचे बुकिंग केले आहे.