प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये होणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत स्थगित

मुंबई- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात होणार्‍या विविध विकासकामांमुळे बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये केले जाणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पालिका आरोग्य समितीचा अहवाल आल्यानंतर हा अहवाल पुनर्वसनासाठी सकारात्मक असला तरच त्याठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल,असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये घरे दिली जात आहेत.मात्र माहुल परिसरातील रासायनिक कंपन्यांमुळे त्याठिकाणी राहण्यास रहिवाशांनी अनेकदा विरोध दर्शविला आहे.त्यासाठी सातत्याने आंदोलने केली आहेत. विशेष म्हणजे न्यायालयानेही प्रकल्पग्रस्तांचे तिथे जबरदस्तीने पुनर्वसन करता येणार नसल्याचे पालिकेला ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य समितीचे अहवाल मागवले आहेत.हे दोन्ही अहवाल आल्यानंतर त्यात जर माहुल परिसर राहण्यास योग्य असल्याचा निष्कर्ष काढला असेल तरच या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्याठिकाणी करता येणार आहे.

दरम्यान,सध्या माहुलमध्ये १७ हजार घरे बांधून तयार असून त्याठिकाणी ५८०० कुटुंबे राहत आहेत. याठिकाणी ५ हजार घरे रिकामी आहेत. ५०० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर मालाडमधील एसआरएच्या घरांमध्ये करण्यात आले आहे. पालिकेला एकूण प्रकल्पग्रस्तांसाठी ३० हजार घरांची आवश्यकता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top