हिंगोली – यंदाचा बैल पोळ्याचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. मात्र, यंदाही या बैलांच्या सजावटीसाठी लागणार्या साहित्याला महागाईचा फटका बसला असून किमतींमध्ये चार ते पाच टक्के वाढ झाली आहे.
शेतकर्यांचा मित्र म्हणून वर्षभर शेतात राबणार्या बैलांच्या पूजेचा पोळा सण येत्या १४ सप्टेंबर रोजी आहे. हा सण श्रावणी अमावस्येला येतो. या अमावस्येला पिठोरी अमावस्याही म्हटले जाते. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील विशिष्ट भागात हा पोळा हा सण साजरा केला जातो. यात आदल्या दिवशी सर्जा-राजाचे खांदेमळण केले जाते. दुसर्या दिवशी अमावस्येला बैलांना घुंगरू माळा, म्होरक्या दोर, बाशिंग, झूल, कवडी, झालर, माथोटी, दोर आदी वस्तूंनी सजवले जाते. त्याची पूजा करून त्याला पुरणपोळी खाऊ दिली जाते. मात्र, यंदा या बैलांच्या सजवाटीचे साहित्य चार ते टक्क्यांनी महागल्याने शेतकर्यांच्या खिशाला फोडणी बसणार आहे.