मुंबई –
मुंबईमध्ये ७ मे रोजी पोलीस भरती लेखी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत आधुनिक यंत्राच्या साहाय्याने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लेखी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी बटन कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिकेचे फोटो ई-मेलद्वारे परीक्षा केंद्राबाहेर पाठवले. या प्रश्नांची उत्तरे काही मिनिटात केंद्राबाहेरील शिक्षकांच्या मदतीने काढून मायक्रोहेडफोनची मदत घेऊन लिहिली, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आला आहे. दरम्यान परीक्षेत कॉपी करणाऱ्या या विदयार्थ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी या परीक्षेचे केंद्र होते. या परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या या विदयार्थ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडुप पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईतील पोलीस शिपाई पदासाठी ७८ हजार ५२२ परीक्षार्थीनी रविवारी लेखी परीक्षा दिली. शहरातील २१३ केंद्रांमध्ये ही परीक्षा झाली. त्यासाठी १२४६ पोलीस अधिकारी व पाच हजार ९७५ कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. परंतु याच परीक्षेदरम्यान हायटेक कॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.. अभ्यास करुन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना याचा मोठा फटका बसेल, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थींकडून व्यक्त होत आहे.