मुंबई- पोलिसांना निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जाणे अनिवार्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याबरोबरच निवडणूक कामासाठी मुंबईबाहेर जाण्यास नकार देणाऱ्या २१ पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासही नकार दिला आहे. सुटीकालीन न्यायमूर्ती संदीप मारणे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या पीठाने काल हा निकाल दिले.
मुंबईतील २१ पोलीस निरिक्षकांची निवडणूक कामासाठी मुंबईच्या बाहेर बदली करण्यात आली होती. त्याला आव्हान देत हे निरीक्षक मॅटमध्ये गेले होते. मॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यानंतर पोलीस महासंचालक उच्च न्यायालयात गेले. त्यावर काल सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी मॅटचा निर्णय रद्द ठरवत या पोलिसांना मुंबई बाहेर जावेच लागेल हे स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, वैयक्तिक कारणे ही सार्वजनिक कर्तव्याच्या आड येऊ शकत नाहीत. निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे या पोलिसांनी त्यांना पाठवलेल्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू व्हावे.