सोलापूर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवर होणारे मतदान पोलिसांनी प्रचंड दबाव टाकून बंद पाडले. त्यासाठी पोलिसांनी आज सकाळपासून गावात जीप फिरवित लाऊडस्पीकरवर घोषणा केल्या की, मतदानासाठी एकत्र आलात तर कडक कारवाई होईल. यामुळे मतदार घाबरून घरात बसले आणि अखेर बॅलेट पेपरवर मतदानाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. ईव्हीएम मशीन हॅक झाली होती का? हे समजण्याची संधी पोलिसांनी मतदारांना घाबरवून हाणून पाडली.
पोलिसांच्या दबावामुळे ग्रामस्थ मतदानाला यायला घाबरू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विजयी आमदार उत्तमराव जानकर यांनी अखेर ग्रामस्थांशी चर्चा करून मतदान रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून राज्यात ठिकठिकाणी नेते आणि मतदार ईव्हीएम यंत्राबाबत संशय व्यक्त करीत आहेत. 24 उमेदवारांनी फेरमोजणीसाठी पैसे भरून आयोगाकडे अर्ज केला आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीतील ग्रामस्थ कायम उत्तम जानकर यांना मतदान करायचे. मात्र यावेळी भाजपाचे राम सातपुते यांना गावात जास्त मते पडली. हे अशक्य आहे अशी चर्चा गावात सुरू झाली. त्यानंतर मतांबाबत शंका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत मतपत्रिकांवर मतदान घेण्याचे ठरविले. आज मतदान झाले असते तर ईव्हीएम मशीनबाबत व्यक्त होणार्या संशयाचे निरसन झाले असते. मात्र पोलिसांनी मतदारांना घाबरवल्याने मतदानच रद्द झाले.
आज गावात बॅलेट पेपरवर मतदान होणार होते. त्यासाठी 5 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. बॅलेट पेपर तयार केला होता. मात्र पोलिसांनी काल गावात संचारबंदी लागू केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात झाला. 5 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर कारवाई होईल, असे लाऊडस्पीकरवर सांगत पोलिसांची जीप फिरली. पोलिसांच्या भीतीने जेमतेम 200 जण मतदानाला आले. सर्व गावकरी मतदानाला येणार नाहीत असे लक्षात आल्यावर जानकर यांनी गावकर्यांशी चर्चा करून मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही स्वखर्चाने हे मतदान घेणार होतो. त्यासाठी प्रशासनाकडे कसलीही मदत आम्ही मागितली नव्हती. आमच्यासारखाच
महाराष्ट्रातील अनेकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मारकडवाडीत मतदान झाले असते तर संपूर्ण महाराष्ट्राला ईव्हीएमचे सत्य कळले असते. म्हणूनच पोलिसांनी गावात संचारबंदी लागू केली. बंदोबस्त वाढवला. एक जरी मत टाकले गेले तर मतपेट्या जप्त करू, अशी धमकी पोलीस देत होते. पोलिसांच्या गाड्या लाऊडस्पीकरवर मतदानासाठी बाहेर पडू नका, असा इशारा देत गावभर फिरत होत्या. मी स्वतः ग्रामस्थांसोबत काल रात्री मतदान केंद्राबाहेर चटया टाकून झोपलो होतो. पण पोलिसांच्या भीतीने बरेचसे ग्रामस्थ घरी निघून गेले. अशा परिस्थितीत मतदान घेण्यात अर्थ नाही असे वाटल्याने आम्ही मतदान रद्द केले. पण न्याय मिळविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कायदेशीर लढा देऊ. प्रसंगी मोर्चाही काढू, असे जानकर यांनी पत्रकारांना सांगितले.