पैठण- राज्यातील मोसंबीचे आगार समजल्या जाणार्या पैठण तालुक्यात यंदा मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.हवामान बदल व जमिनीतील उष्णता व आर्द्रतेचा फटका बसून फळांची बेसुमार गळ होत आहे.मोसंबीची होणारी गळ व फळावर पडलेल्या डासमाशीच्या प्रार्दुभावामुळे मोसंबी उत्पादक संकटात सापडला आहे.यामध्ये दररोज लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे चित्र प्रामुख्याने पाचोड परिसरात दिसत आहे.
पैठण तालुक्यात ९,४२९ मोसंबी उत्पादक शेतकऱ्याकडे ८,६२६ हेक्टरवर फळधारणा झालेले मोसंबीचे क्षेत्र असून ऊस व कापसानंतर मोसंबी महत्त्वाचे पीक मानले जाते. दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीच्या तर यंदा पाणीटंचाईच्या संकटातून बागा कशाबशा जगल्या.पण आता चांगल्या फळांनी मोसंबीचे झाडे लगडून गेली असतानाच डास माशीचा प्रादुर्भाव सुरू झाला.त्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जमिनीची उष्णता आणि आर्द्रतेमुळे फळांना गळती लागली आहे.’मगरी’ नावाचा आजार उद्भवून मोसंबी झाडावरच पिवळी होऊन झाडाखाली सडा पडल्याचे पाहवयास मिळते.मात्र, अद्याप कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करून प्रतिबंधात्मक उपाय सुचवलेले नाहीत.