नवी दिल्ली – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-यूजी परीक्षा आता पेपर आणि पेन यांच्या सहाय्यानेच घेण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ही परीक्षा पेपर-पेनच्या सहाय्याने घ्यावी की ऑनलाइन पद्धतीने घ्यावी या दोन पर्यायांवर सरकारने बारकाईने विचार केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एनटीए अर्थात राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने दिली.
एनटीएने सांगितले की नीट-यूजी परीक्षा एकाच दिवशी व एकाच शिफ्टमध्ये पेपर व पेनच्या सहाय्याने घेतली जाईल असा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.२०२४मध्ये नीट-यूजी परीक्षेस २४ लाख विद्यार्थी बसले होते. नीट-यूजी व यूजीसी-नेट या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप असून त्या प्रकरणांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये काय कारवाई होते याकडेही अनेकांचे लक्ष आहे.