पेण – आंबिवली ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन हर घर योजनेद्वारे पाईप लाईनला पाणी उपलब्ध असताना तीन दिवसाआड पाणी सोडले जात आहे.त्यामुळे गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत. पाण्यासाठी राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केंद्र व राज्य सरकारने पाण्याच्या योजनांसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत,असे असताना पेण तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही.आंबिवली ग्रामपंचायतमधील महिलांना व नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.मागील तीन वर्षांपूर्वी आंबिवली गावातील विहिरीतून पूर्ण गावाला पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळी कधीच पाणीटंचाई भासली नाही.
परंतु गेल्या वर्षी जल जिवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना राबवून या विहीरीतील पाणी पुरवठा लाईन बंद करुन जिते येथून नवीन लाईन टाकण्यात आली.तेव्हापासून नागरीकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू झाले असून पाईप लाईनला पाणी उपलब्ध असताना तीन दिवसाआड पाणी सोडून पाण्यासाठी राजकारण होत असल्याचा आरोप आंबिवली ग्रामपंचायत माजी सरपंच नेहा प्रशांत पाटील यांनी केला.