रायगड-अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला वाजतगाजत निरोप दिल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा रायगडात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण अनुभवयास मिळत आहे.रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात काल भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून साखरचौथ गणेशाची स्थापना करण्यात आली.यंदा या तालुक्यात साखरचौथीच्या सुमारे २८० पेक्षा जास्त गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
पेण तालुक्यात साखरचौथीच्या सार्वजनिक ७६ आणि घरगुती २०४ गणेशमूर्तीची स्थापना केली आहे.साखरचौथीच्या गणपतीची स्थापना पूर्वी खास करून गणेशमूर्ती कारखानदार व कामगार करीत असत. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कारागीर कामात व्यग्र असतात.तर काही कारागीर मूर्तीविक्रीसाठी बाहेरगावी जात असल्याने अनेक कारखानदार व कामगारांना आपल्या घरात तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेता येत नव्हता. त्यामुळे साखरचौथच्या गणपतीची संकल्पना रायगडमध्ये अस्तित्वात आली असावी, असे मानले जाते. शिवाय ज्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी काही कारणास्तव गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य नसते,त्यांच्याकडून साखरचौथ गणपती आणला जातो.विभक्त कुटुंब पद्धतीत प्रत्येकाला हौस म्हणून गणपती आणावसा वाटतो. गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुयेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथच्या दिवशी पर्याय म्हणून गणपतीची प्रतिष्ठापना करतात. साखरचौथीच्या गणपतीच्या प्रथेमागे कोणताही लिखित व शास्त्रीय आधार, कोणतीही पौराणिक कथा नाही; परंतु वर्षानुवर्षे परंपरागत ही प्रथा चालत आली आहे. पूर्वी हे गणपती दीड दिवसाचे होते; परंतु काही वर्षांपासून अनेक ठिकाणी अडीच, पाच दिवसांच्या गणरायांची प्रतिष्ठापना केली जाते.
पेणचा साखरचौथ गणेशोत्सव! २८० हून अधिक मूर्तींची स्थापना
