पणजी- उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील न्हायबाग-मालपे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आली आहे.मात्र या जुन्या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने दुचाकीसारख्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसातच न्हायबाग-मालपे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास भागात मोठी दरड कोसळली आहे.त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आली आहे. पण हा जुना रस्ता आधीच खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. त्यातच ही नवीन वाहतुक या रस्त्यावर वळविण्यात आली आहे.त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.प्रामुख्याने यामध्ये दुचाकीस्वारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. रात्रीच्यावेळी समोरून येणार्या वाहनांच्या प्रखर हेडलाईट्समुळे खड्डे दृष्टीस पडत नाहीत.त्यामुळे अनेक वाहने खड्ड्यात पडण्याच्या घटना घडत आहेत.