मुंबई – मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनवरून महापालिका आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी टीका होत आली आहे. त्यात आता देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत २० कोटींच्या अंदाजित खर्चासाठी पालिका प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. यावरून पुन्हा एकदा पालिकेवर टीका होण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले होते. त्यामधील एकाचा मृत्यू झाल्याने ७ पेंग्विन राहिले. त्यावरून भारतातील वातावरण पेंग्विनसाठी योग्य नाही, तरीही ते आणण्यात आले, अशी टीका आदित्य ठाकरेंवर करण्यात आली होती. पेंग्विनसाठी उभारण्यात आलेल्या विशेष वातानुकुलित कक्षाचे काम काळ्या यादीतील कंत्राटदाराला दिल्याचीही टीका झाली होती. मात्र राणी बागेतील सात पेंग्विनना गेल्या काही वर्षात पिल्ले झाली. त्यामुळे राणी बागेतील पेंग्विनची संख्या आता ७ वरून १८ झाली आहे . पेंग्विनच्या या वाढत्या संख्येमुळे खर्चातही वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाने निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी हा खर्च १५ कोटी रुपये होता. आता त्यात ५ कोटींची वाढ झाली असून तो २० कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.