न्यूयॉर्क – पृथ्वीच्या पोटात ७०० किमी खोल अंतरावर संशोधकांना एक मोठा महासागर सापडला आहे. या महासागरात जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा आहे. हा महासागर पाण्याचा आजपर्यंतचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे मानले जात आहे.महासागराचा शोध घेणाऱ्या टीमचे प्रमुख सदस्य आणि भूभौतिकशास्त्रज्ञ स्टीव्ह जॅकबसन यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, भूगर्भातील रिंगवूडाइट नावाच्या खडकात सापडलेला हा महासागर म्हणजे पृथ्वीच्या जलचक्राचे पुरावे आहेत. रिंगवूडाइट खडक हा पाणी शोषून घेणाऱ्या स्पंजसारखा आहे. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ यावर संशोधन करत होते. या भूमिगत महासागराचा शोध घेण्यासाठी अमेरिकेमध्ये २००० भूकंपमापकांचे विस्तृत जाळे तयार करण्यात आले होते. ५०० हून अधिक भूकंपांमधून निर्माण झालेल्या तरंगलाटांचा अभ्यास करण्यात आला.