पूरमुक्त मुंबईसाठी भूमिगत पर्जन्य
जलवाहिन्यांची स्वछता मोहीम

महापालिका तब्बल १३० कोटी रुपये खर्चणार

मुंबई

मुंबईतील ९८ किलोमीटर भूमिगत ब्रिटिशकालीन पर्जन्य जल वाहिन्यांची स्वच्छता लवकरच करण्यात येणार आहे. पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. या जल वाहिन्यांतील कचरा, गाळ पाईपच्या मदतीने शोषून घेऊन साफ केला जाणार आहे. त्यानंतर पाईपच्या साहाय्याने पाण्याचा मारा केला जाणार आहे. वाहिन्यांतील विषारी वायू यंत्रणाच्या सहाय्याने बाहेर काढला जाणार आहे. तसेच या जलवाहिन्यांची स्वच्छता झाल्याचे पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपासणी करण्यात येणार आहे.

कुलाबा, नरिमन पॉइंट, फोर्ट, वरळी, माटुंगा, धारावी, सायन, ग्रँट रोड या मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्य जल वाहिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या कामाकरीता मुंबई महापालिका तब्बल १३० कोटी रुपये खर्च करणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई पूरमुक्तीसाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. मुंबईतील या जलवाहिन्यांचे परिरक्षण व दुरुस्तीची कामे पर्जन्य जलवाहिन्या प्रचालने व परिरक्षण उप विभागामार्फत करण्यात येते. मुंबई हे शहर सुमारे ३,५०० किलोमीटर लांब अंतराचे पर्जन्य जलवाहिन्या जाळे आहे. यामध्ये लहान – मोठ्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या, खुल्या व बंदिस्त, भूमिगत अशा सर्व प्रकारच्या आणि कमानी (आर्च), बॉक्स (कपाट), पाईप (गोल) अशा वेगवेगळ्या आकाराच्या वाहिन्यांचा समावेश आहे.

Scroll to Top