यवतमाळ:- राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. मागच्या काही दिवसांपासून पारा ४३ डिग्रीपर्यंत गेल्याने यवतमाळकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. मात्र गुरुवारपासून पुन्हा वातावरणात बदल झाला. गुरुवारी नेर परिसरातील काही गावांना अवकाळी पावसाने झोडपले. शुक्रवारी पुसद आणि महागाव तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली. गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले.
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पांढुर्णा आणि बेलोरा या गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. याबरोबरच महागाव तालुक्यातील महागाव शहरासह वेणीमध्येही गारपीट झाली आहे. तर जोडमोहा, डोंगरर्खडा, मेटीखेडासह नांझा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महागाव तालुक्यात वेणी येथे या पावसामुळे केळी बागांचे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी गावरान आंब्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने फटका दिला. भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.