हैदराबाद – 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या पहिल्या खेळावेळी अभिनेता अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी झालेल्या रेटारेटीत रेवती या 35 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा 9 वर्षांचा मुलगा श्रीतेजा हा बेशुद्ध झाला. रेवतीच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने त्वरित 25 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आणि माफी मागितली. मात्र या प्रकरणी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने आज हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. दरम्यान, मृत रेवतीच्या पतीने, अल्लू अर्जुनची काही चूक नसून आपण तक्रार मागे घ्यायला तयार असल्याचे सांगितले आहे.
अल्लू अर्जुनने अटक झाल्यानंतर गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. ही याचिका निकाली निघेपर्यंत अटक होऊ नये व पुढील कारवाई स्थगित करावी अशी विनंती केली होती. त्याला अटक होऊन कोठडी सुनावल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. परंतु उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन देताना म्हटले की, अल्लू अर्जुन हा अभिनेता असला तरी त्याला आपले जीवन जगण्याचा आणि स्वातंत्र्य उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे.
‘मैं फ्लावर नहीं, पावर है ‘या संवादाने सुपरहिट झालेला पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी संध्या थिएटरबाहेर खूप गर्दी झाली होती. यावेळी अल्लू अर्जुन आणि चित्रपटातील इतर कलाकार येणार आहेत हे कुणालाही माहीत नव्हते. थिएटर व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांनीही पोलिसांना आपण येणार असल्याचे सांगितले नव्हते. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त व्यवस्था केली नव्हती. अल्लू अर्जुन अचानक थिएटरवर आल्याने त्याला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली अशी माहिती चिक्कडपल्ली पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर बी. राजू नाईक यांनी दिली. त्यात रेवती यांचा मृत्यू झाला होता. यामुळे अल्लू अर्जुन आणि थिएटर मालकावर गुन्हा दाखल झाला होता. बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान, सलमान खान यांच्याइतकीच अल्लू अर्जुनची लोकप्रियता आहे.