पुरी – पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले . काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली . आज रथयात्रेचा दुसरा दिवस होता. काल पहिल्या दिवशी रथाने केवळ ५ मिटरच प्रवास केला. त्यानंतर सुर्यास्तामुळे ही रथयात्रा थांबवण्यात आली होती.पुरीची जगन्नाथ रथयात्रा गेल्या ५३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच दोन दिवस चालली. आज भगवान बलभद्र, सुभद्रा व भगवान जगन्नाथ यांचे रथ गुंडिचा मंदिरात पोहोचले. उद्या भगवान मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ११ जुलै रोजी हेरापंचमीचा उत्सव साजरा होणार असून १५ जुलै रोजी तीन्ही देव रथातून आपल्या मंदिरात परत येणार आहेत. देवाच्या या परतीच्या प्रवासाच्या यात्रेला बहुडा यात्रा म्हटले जाते.