मुंबई- भारताचा इतिहास ज्या सिंधु संस्कृतीपासून सुरू होतो त्या इसवी सन पूर्व 1000 ते 3000 काळातील सिंधु संस्कृतीच्या लिपीचा अर्थ उलगडण्यास लिपीकार यश देवम या अमेरिका स्थित भारतीय तज्ज्ञाला यश आले आहे. आपण सिंधु संस्कृती काळातील हरप्पन लिपी वाचू शकतो असा त्यांनी दावा केला आहे. त्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी गुजरातच्या धोलविश येथे उत्खनन करून सापडलेल्या वसाहतीच्या प्रवेशद्वारावर हरप्पन लिपीचा अर्थ ‘हिरे माणिक प्रवेश द्वार’ असा असल्याचे कळते. त्या काळाहिरे, माणकांचा शोध लागला होता आणि त्याचा व्यापारही होत होता.
हडप्पा व मोहेंजो दारो मिळून सिंधु संस्कृती मानली जाते. सिंधू व सरस्वती नदीच्या काठी इराणपासून भारतापर्यंत ही संस्कृती आढळते. त्या काळात चित्रलिपी होती. वरच्या बाजूला चित्र आणि खालच्या बाजूला प्राण्याचे चित्र अशी लिपी आढळते. या लिपीची पहिली ओळ उजवीकडून डावीकडे आणि दुसरी ओळ डावीकडून उजवीकडे वाचली जायची हा शोध यापूर्वी लागला होता. परंतु लिपी वाचता येत नव्हती. लिपीतील प्रत्येक चित्र हे स्वतंत्र अक्षर आहे की शब्द आहे याचाही उलगडा होत नव्हता. अनेक तज्ज्ञ या लिपीचा अभ्यास करीत होते.
आता तज्ज्ञ यज्ञदेवम यांनी लिपीचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. या लिपीत एका ओळीत कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त चौदा चित्र आढळतात. यज्ञदेवम यांनी जवळजवळ 400 चित्रांचा अभ्यास केला आणि आता त्याचा अर्थ लावला आहे. हा ऐतिहासिक शोध आहे. यामुळे या संस्कृतीची महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे. यज्ञदेवम म्हणाले की, या लिपीत 30 मूळ अक्षरे आहेत जी वेगवेगळ्या क्रमाने वापरली आहेत. यात सर्वात पुरातन समजल्या जाणाऱ्या ब्राह्मी भाषेचे अस्तित्व आहे. भारत, पाकिस्तान, इराण या व्यापारी मार्गावर ही लिपी वापरली जात होती.