दिवे – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हा प्रकल्प पुण्याच्या विकासासाठी महत्वाचा असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र मुख्यमंत्र्याच्या याच विधानावरून पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुण्याच्या विकासासाठी स्थानिक शेतकऱ्यांना कायमचे विस्थापित व्हावे लागत असेल, तर प्रकल्प नक्की कोणासाठी आहे ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजवडी आणि खानवडी अशा सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर झाला आहे. या गावांतील २८३५ हेक्टर क्षेत्र संपादित करणार आहेत. यामध्ये गावठाण वगळणार असल्याचे शासनाने सांगितले आहे. याशिवाय संपादित केलेल्या जागेतच चार ते पाच किलोमीटर लांबीच्या पूर्व पश्चिम दोन धावपट्ट्या केल्या जाणार आहेत. मात्र वनपुरी पासून पारगावचे अंतर सात ते आठ किलोमीटर आहे. त्यामुळे धावपट्टीमधून गावठाण कसे वगळणार ? यावर प्रश्नचिन्ह आहे.