पुणे- पुरंदर तालुक्यातील दौंडज आणि वाल्हे परिसरात मागील दोन वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या वर्षात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पाणीसाठाही जेमतेम झाला होता. मात्र आताच या परिसरातील नाले, बंधारे, तलाव कोरडेठाक पडले आहेत.
जमिनीतील पाणीपातळीत घट होत असल्याने सध्या या भागाची दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे शेतकरीवर्गात बोलले जात आहे. रब्बी पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच पाणी कमी पडू लागल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थंडीचा जोर अद्यापपर्यंत टिकून राहीला असल्याने गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके सुस्थितीत आहेत. मात्र विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने पेरलेली रब्बी पिके व ऊस वाचविण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे. या भागात पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत दौंडज परिसरातील वाड्या-वस्त्यांवर तसेच वाल्हे परिसरातील वागदरवाडी, बहिर्जीचीवाडी, बाळाजीचीवाडी,
मोरूजीचीवाडी, झापाचीवाडी, पवारवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, मुकदमवाडी, सुकलवाडी आदी परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला टँकर सुरू करावे लागणार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
पुरंदरच्या वाल्हे परिसराची दुष्काळाकडे वाटचाल !
