पुणे – आगामी काळात वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका येतील, त्यामध्ये आमची कामगिरी सर्रस किंवा समाधानकारक झाली आणि निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवून चांगली मते मिळाली तर, हा राष्ट्रीय दर्जा आम्हाला पुन्हा मिळू शकतो’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अन्य राज्यांमध्ये निवडणूका लढवून त्यात किमान चार टक्के मते मिळवणे व लोकप्रतिनिधी निवडून येणे हा जो नियम आहे त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल परंतु येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह महाराष्ट्रापुरते कायम राहिल यात शंका नाही. आम्ही नागालँडमध्ये निवडणूका लढवल्या तिथे सात आमदार निवडून आले आहेत. लक्षद्वीपमध्ये आमचे खासदार आहेत परंतु तिथे विधानसभा नाही. त्यामुळे ते राज्य गृहीत धरले जात नाही. ही घटना पक्षासाठी सेटबॅक आहे असे मला वाटत नाही कारण घड्याळ या चिन्हाचा महाराष्ट्रातील हक्क आमचा गेलेला नाही. त्यामुळे येत्या चार – सहा महिन्यानंतर हा दर्जा पुन्हा आम्हाला प्राप्त होईल. या निर्णयाने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाही.