पूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. ते म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा ब्रॉन्झचा होता. पण त्याच्या डोक्यात कापूस आणि कागद भरला होता, अशी मला माहिती मिळाली आहे. ही मूर्ती करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. त्याला मोठे पुतळे बनविण्याचा अनुभव नाही. तरी त्याला हे काम दिले. सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही धक्कादायक आरोप करीत सवाल केला की, महाराजांच्या कपाळावर मूर्तीकाराने मुद्दाम खोक का ठेवली? (ही खोक शिवरायांनी अफजल खानाचा वध केला त्यावेळी त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने तलवारीने महाराजांना मारण्यासाठी वार केला त्यावेळी पडली, असे सांगितले जाते.) अजित पवार गटाने नुसते आरोप केले नाही तर या घटनेचा निषेध करीत आज चेंबूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि पुण्यात आंदोलन केले. बीडच्या कार्यक्रमात अजित पवारही कडाडले आणि म्हणाले की, या गुन्ह्याला माफी नाही. या सर्व आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्यावरून आताही राज्यात वातावरण तापलेलेच आहे. यावरून विरोधक केंद्र आणि राज्य सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, शिल्पकार व आर्किटेक्ट नव्हे तर राज्य सरकार जबाबदार आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण असो किंवा राजकोटची पुतळा कोसळण्याची घटना, या सर्वाला देवेंद्र फडणवीस राजकारण म्हणून पाहतात. हे राजकारण नव्हे तर आस्थेचा प्रश्न आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. या कमिशनखोरीला कोणते राजकारण म्हणायचे? महायुती सरकारमध्ये कायदा सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिला नाही. या सरकारला माज आला आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले, मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याने जाणीवपूर्वक महाराजांच्या डाव्या डोळ्याच्यावर कपाळावर खोक ठेवली होती. याची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, जयदीप आपटे हा जिथे कुठे दडून बसला असेल त्याला शोधून काढावे.
नेते रोहित पवार आज एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, पुतळ्याचा खर्च 2.40 कोटी रुपये दाखवला आहे आणि या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान मोदी येणार म्हणून जे तात्पुरते तीन हेलिपॅड उभारले त्यासाठी 2.2 कोटी रुपये खर्च केले.
पुतळ्यावर नव्हे तर
चबुतरावर काम केले!
पोलिसांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार आहेत. मात्र, चेतन पाटील यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. चेतन पाटील यांनी म्हटले आहे की, राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करून दिले होते. याशिवाय, शिवरायांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतेही काम माझ्याकडे नव्हते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला दिले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात माझे नाव असले तरी पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नाही. ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल, तेव्हा मी ते पुरावे न्यायालयासमोर सादर करीन.
पुतळ्याबाबत काँग्रेस व अजित पवार गटाचेही आरोप! डोक्यात कागद आणि कापूस! कपाळावर खोक
