पुतळ्याचे डिझाईन अयोग्य! गंज पकडला वेल्डिंगही चुकीचे! धक्कादायक अहवाल!

मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आज आपला 16 पानी अहवाल राज्य सरकारला दिला आहे. या अहवालानुसार पुतळ्याचे सर्वच काम अयोग्य होते. पुतळ्याचे डिझाईन चुकीचे होते, गंज चढला होता, वेल्डिंग चुकीचे होते अशी पुतळा कोसळण्याची धक्कादायक कारणे या अहवालात नमूद करण्यात आली आहेत.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत अक्षम्य निष्काळजीपणा झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटवरील 35 फूट उंच या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी स्ट्रक्चरल इंजिनिअर चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. 30 दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करावा, असे आदेश या समितीला सरकारने दिले होते. पुतळा दुर्घटनेच्या एका महिन्यानंतर चौकशी समितीने 16 पानांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे सादर केला आहे.
या अहवालात पुतळा कोसळण्याची मुख्य कारणे नमूद करण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही. त्यामुळे पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता. पुतळा उभारलेले फ्रेमवर्क हवे तितके मजबूत नव्हते. चुकीच्या पद्धतीने पुतळ्याला वेल्डिंग करण्यात आले होते. या पुतळ्याचे डिझाइनही योग्य नव्हते. या सगळ्याचा परिणाम होऊन पुतळा कोसळला असे अहवालात म्हटले आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, या अहवालातून पुतळा पडण्याची अनेक कारणे उघड झाली आहेत. चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. सुप्रिया सुळे म्हणाल्या की वेल्डिंग नीट होत नाही हा भ्रष्टाचारच आहे. हे सरकारच भ्रष्टाचारी आहे. प्रत्येक गोष्टीत यांचा भ्रष्टाचार चालतो. दरम्यान राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.

आ. वैभव नाईकांना
पोलिसांची नोटीस

शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याच्या बाबतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची टीका केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. वैभव नाईक यांनी सांगितले की, नौदलाकडून खर्चाचा तपशील आल्यावर पोलिसांना माहिती देईन. यावर भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर नेहमीच्या शैलीत आगपाखड केली. निलेश राणे म्हणाले की, शिवाजी महाराजाच्या पुतळा दुर्घटनेबाबत पोलिसांनी वैभव नाईकांना चौकशीसाठी का बोलावले आहे? पुतळ्याबाबतच्या अहवालात वेल्डिंग नीट झाली नव्हती, गंज चढला अशी माहिती दिली आहे. मात्र वेल्डिंग नीट झाली नव्हती की ती नंतर बिघडवण्यात आली? यासाठी आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top