पुतळा व उद्घाटन कार्यक्रमाचा निधी नारायण राणेंनी लोकसभेला वापरला – वैभव नाईकांचा खळबळजनक आरोप

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कुडाळचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक आरोप केला की, हा पुतळा उभारण्यासाठी व उद्घाटन समारंभासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडून निधी घेऊन त्यात भ्रष्टाचार करण्यात आला. हा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वापरला.
राजकोट किल्ल्यावर गेल्या वर्षी नौसेना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला होता. हा पुतळा करण्यासाठी 2 कोटी 40 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती यापूर्वी उघड झाली होती. पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणार्‍या पाहुण्यांसाठी तात्पुरते हेलिपॅड व मंडप उभारण्यासाठी 2 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. आज आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणार्‍या जयदीप आपटेला आत्तापर्यंत केवळ 26 लाख रुपये देण्यात आले आहेत. म्हणजे एकूण खर्च 2 कोटी 40 लाख असेल, तर उरलेले पैसे कुठे गेले? हा एवढाच भ्रष्टाचार नाही तर पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाने 5 कोटी 54 लाख 35 हजार रुपये दिले. यात पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणार्‍या पाहुण्यांसाठी तात्पुरते हेलिपॅड व मंडप उभारणी यासाठी 2 कोटी 20 लाख खर्च करण्यात आले. जिल्हा नियोजन विभागानेच याची लेखी माहिती दिली आहे. नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधनदेखील जिल्हा नियोजनच्या पैशातून भरण्यात आले होते. हे देशात पहिल्यांदाच घडले असेल. हा कार्यक्रम नौसेनेचा असेल तर नौसेनेने खर्च करायला हवा होता. त्याऐवजी सिंधुदुर्ग नियोजन विभागाने हा खर्च का केला? यामुळेच या प्रकरणात नौसेना गप्प राहिली आहे. आम्ही केवळ विरोधक म्हणून हे आरोप करत नाही तर आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून हे आरोप करत आहोत. या भ्रष्टाचाराचे पुरावे असतानाही पोलिसांनी त्याचा तपास केलेला नाही. त्यांनी केवळ जयदीप आपटेला अटक केली.
आ. नाईक असेही म्हणाले की, ही घटना घडून महिना उलटून गेला तरी पालकमंत्री, सत्ताधार्‍यांनी एक शब्द काढलेला नाही. उलट आम्ही आरोप करतो म्हणून आमच्यावरच आरोप करण्यात आले. या घटनेत माझा हात असल्याचा आरोप केला. माझ्याविरोधात पाच ते सहा दिवसांत पुरावे देतो, असे म्हटले होते ते पुरावे देणारे कुठे गेले? आता एक महिना पूर्ण होत आला तरी ते माझ्याविरुद्धचे पुरावे देऊ शकले नाहीत. केवळ लोकांचे लक्ष भ्रष्टाचाराकडून दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी असे आरोप केले होते, हे यावरून स्पष्ट होते.
या प्रकरणी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. यासाठीही आम्ही अर्जही केला आहे. त्यासाठी कागदपत्रे तयार करण्याचे काम करत आहोत. या याचिकेतून आम्ही दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top