पुण्यात 6 वर्षांच्या दोन चिमुकलींवर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार

पुणे – अल्पवयीन मुलींवर शाळेत किंवा शाळेच्या बसमध्ये लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटना रोजच घडत आहेत. यावर गंभीर उपाय करीत शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. बदलापूर आणि पुणे येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आज पुन्हा शाळेच्या बसमध्ये सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर बसच्या ड्रायव्हरने अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यात दोन 6 वर्षांच्या चिमुकलींवर शाळेच्या बस चालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी (45 रा. वैदुवाडी, हडपसर, पुणे) बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेऊन आज तातडीने पुणे न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर पुणे न्यायालयाने आरोपीला 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता करू नये म्हणून आरोपीने त्या मुलींना धमकीही दिली होती.
आरोपी बसचालक हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करत असतो. हा आरोपी बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवायचा आणि त्यांच्यासोबत लैंगिक अश्‍लील चाळे करत होता. गेल्या चार दिवसांपासून तो सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचे नाही, अशी धमकीही त्याने मुलींना दिली होती. अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुरडीने आईला सांगितले. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) आणि विनयभंगअंतर्गत गुन्हा
दाखल केला.

पोलिसांनी बस उघड्यावर ठेवली
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी पुराव्यासाठी महत्त्वाची असलेली शाळेची बस तशीच उघड्यावर ठेवून दिली. दुपारी पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली ही शाळेची बस फोडली. यावेळी कार्यकर्त्यांनी या प्रकरणात खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी बसची तोडफोड करणार्‍यांना ताब्यात घेऊन बस दुसर्‍या ठिकाणी हलविली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top