पुण्यात २ दिवसांत ५ जणांची हत्या झाल्याने खळबळ

पुणे- पुणे शहरात दोन दिवसांत पाच हत्यांच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनांमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
पहिली घटना पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात घडली. गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरुन ४ जणांनी १८वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण केली.त्यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी घटना ही सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री तीन अल्पवयीन तरुणांनी पूर्व वैमन्यस्यातून एका तरुणाचा खून केला. तिसरी घटना वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणावर पूर्व वैमन्यस्यातून कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी वानवडी पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. वाघोली लोहगाव रस्त्यावरील अभिलाषा सोसायटी समोर काल राजू लोहार (४८) या व्यक्तीची हत्या करण्यात आला. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी आणि राजू लोहार दोघे दारू पीत बसले होते. त्यावेळी राजू लोहारने आरोपीला उद्देशून “तुझा बाप टकल्या आहे,”असे म्हटले. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले आणि आरोपीने जवळ पडलेला दगड उचलून राजूला मारला. त्यात राजू लोहारचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा येथील मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला या व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. या व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याची हत्या करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top