पुणे : पुण्यात रविवारी सकाळी खाशाबा जाधव क्रीडा संकुलात महिलांसाठी साडी रन या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास ५ हजार ३०० महिला साड्या परिधान करून साडी रन मॅरेथॉनमध्ये धावल्या. ‘साडी नेसून जर स्त्री सगळी कामे करू शकते तर ‘साडी रन’ मध्ये देखील धाऊ शकते,’ या अनोख्या संकल्पनेवर ही मॅरेथॉन आधारलेली होती. यावेळी साडी नेसून धावणाऱ्या महिलांनी समाजास स्त्री शक्तीचा आणि आरोग्याचा संदेश दिला आहे.
ही मोहीम बेंगळुरू स्थित फिटनेस कंपनीने पुण्यात आणली आहे. या वर्षी देशातील ५ अन्य शहरांमध्ये देखील या स्पर्धा होणार आहेत. आई आणि मुलीची जोडी, मैत्रिणींचे ग्रुप, सासू आणि सूनेची जोडी, कुटुंबातील अनेक सदस्य, महिलांच्या ३ पिढ्या जसे आई, मुलगी, नात यांचा सहभाग यावेळी दिसून आला आहे. अनेक महिलांनी रविवारच्या सकाळी आयोजित झालेल्या या साडी रनचा आनंद घेतला. यात खडकी, पिंपरी, आळंदी खडकवासला आणि इतर शेजारच्या शहरांमधून देखील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आरोग्याचा संदेश देणाऱ्या रंगीबेरंगी साड्यांच्या झगमटातील या साडी रन ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.